न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२४) :- वारकरी सांप्रदायाची पार्श्वभूमी लाभलेले पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून नावारूपास आले. या शहराचे विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल पडत असून कटिबद्ध जनहिताय हे ब्रीदवाक्य असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा स्थापना दिवस दि. ११ ऑक्टोबर रोजी जल्लोषात साजरा होत आहे. यानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या स्थापनादिनी येत्या शुक्रवारी सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ होईल.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे. खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.












