न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२४) :- वादामुळे दोन जणांनी मिळून मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना औंध रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी (दि. ८) उघडकीस आली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सीसीटीव्ही फूटेजवरून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला.
पप्पू ऊर्फ जितेंद्र त्रिपाठी (रा. अहोदा, तहसील राजापूर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिव मंगल सिंग (३८) आणि सोमदत्त मनमोहन दुबे (२२, दोघेही रा. अहोदा, तहसील राजापूर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे औंध रुग्णालय परिसरात एकाचा दगडाचा ठेचून खून झाल्याचे उघडकीस आले. मयत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्या वेळी दोघेजण मयत व्यक्तीसोबत दुचाकीवरुन ट्रिपल सीट बसून सांगवी परिसरात दारू घेण्यासाठी आल्याचे दिसून आले. त्यातील एकाच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाची पार्सलची पिशवी होती. संशयित दुचाकीवरुन कोठे जात आहे हे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तो कृष्णा चौकातील कुरिअरच्या कंपनीमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले. कुरिअर कंपनीमध्ये चौकशी केली असता आरोपीचे नाव समोर आले.
आरोपीच्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी पारनेर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर रवाना केले. तांत्रिक तपासातून आरोपी जेवणासाठी अर्धा तास थांबले असल्याचा संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी परिसरातील एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी जेवण करण्यासाठी एक तासापूर्वी थांबल्याचे निष्पन्न झाले. त्या फुटेजवरून आरोपी प्रवास करीत असलेल्या ट्रॅव्हल बस क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपींना समृध्दी महामार्गावरील वाशीम जिल्ह्यातील शेल टोल प्लाझा येथून ताब्यात घेतले.
ट्रॅव्हल्स मालकाला तंबी
तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी ट्रॅव्हल्स मालकाला फोन केला. तुमच्या बसमध्ये आरोपी असून पोलिस पाठलाग करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी बसचा वेग कमी ठेवण्याची तंबी त्यांना दिली. त्यानुसार, बसचालकाने बसचा वेग कमी ठेवल्याने पोलिसांनी वाशीम येथे आरोपी प्रवास करीत असलेल्या बसला गाठत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.












