- हद्दीतील गुंठा, दोन गुंठे जमिनीवरील घरं अधिकृत होण्याच्या वाटेवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑक्टोबर २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) गुंठेवारी कायद्यानुसार घरांच्या नियमितीकरणासाठी अर्ज मागविले असताना त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता त्यासाठी आकारले जाणारे प्रशमन शुल्क कमी करून नव्याने अर्ज मागविले जाणार आहेत.
पीएमआरडीए हद्दीमध्ये नागरिकांनी गुंठा, दोन गुंठे जमिनी घेऊन घरे बांधली आहेत. ही बांधकामे करताना पुरेसे सामासिक अंतर न सोडणे, मंजूर चटई क्षेत्रापेक्षा जादा बांधकाम करण्याचे प्रकार घडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अशी बांधकामे नियमित करता यावीत म्हणून पीएमआरडीएकडून २६ जुलै २०२३ पासून ३० एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज मागविले होते.
पीएमआरडीए प्रशासनाकडे गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यासाठी १६० नागरिकांनी अर्ज केले. त्यापैकी ४० अर्जांना मंजुरी देण्यात आली. सध्या काही अर्जावर कार्यवाही सुरु आहे. तर, काही अर्जाबाबत नागरिकांना पत्राद्वारे त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२० पुर्वी गुंठेवारी पद्धतीने झालेला विकास (प्लॉटिंग, बांधकामे) यामध्ये नियमित केला जात आहे.
पीएमआरडीएच्या सभेत गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यासाठी सुधारित प्रशमन शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क पूर्वीच्या तुलनेत कमी केले आहे. रेखांकनासाठी (प्लॉटिंग) १८ ऑक्टोबर २०२१ च्या शासन आदेशानुसार विकास शुल्काच्या तिप्पट प्रशमन शुल्क निश्चित केले होते. नव्या बदलानुसार आता त्यासाठी दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. रेखांकनातील भूखंडांसाठी रेखांकनानुसार रक्कम वसुली झाली नसल्यास विकास शुल्काच्या तिप्पट रक्कम भरावी लागणार होती. आता ही रकम दुप्पट भरावी लागणार आहे. मूळ मंजूर चटई क्षेत्रापेक्षा जादा केलेल्या बांधकामासाठी वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यातील जमीन दराच्या १० टक्के तसेच सामासिक अंतरात केलेल्या बांधकामासाठीदेखील १० टक्के इतके प्रशमन शुल्क आकारले जाणार होते. मात्र, नव्या बदलानुसार आता हे शुल्क केवळ ४ टक्के इतके आकारले जाणार आहे.
गुंठेवारी कायद्यानुसार घरांचे नियमितीकरण करण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रशमन शुल्क कमी करण्याचा निर्णय पीएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. नवीन दरानुसार गुंठेवारीचे अर्ज स्वीकारण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे. मात्र, त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही.
– सौरभ रांका, सहायक नगररचनाकार, पीएमआरडीए…