- चारशे मतदान केंद्रांची व्यवस्था; प्रांताधिकारी नवले यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. १८ ऑक्टोबर २०२४) :- मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ८० हजार २९७ मतदारसंख्या असून, ४०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी पत्रकार परिषदेत केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर केल्यानंतर प्रांताधिकारी नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता व निवडणुकीविषयी माहिती दिली. यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख उपस्थित होते.
मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये १ लाख ९४ हजार ८३३ पुरुष आणि १ लाख ८५ हजार ४५९ महिला तसेच इतर १३ असे एकूण ३ लाख ८० हजार २९७ मतदार आहेत. एकूण ४०२ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राथमिक सुविधा उपलब्ध करणार असल्याचे नवले यांनी सांगितले.
वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात दि. २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन अर्ज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारण्यात येतील. ३० ऑक्टोबरला या छाननी करण्यात येईल व ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून, यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पाडल्यानंतर तळेगाव येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या स्ट्रॉग रूममध्ये सर्व मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत व मतमोजणी प्रक्रियाही त्याच ठिकाणी होणार असल्याची माहिती नवले यांनी दिली.
८५ वषपिक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अनेक कारणांमुळे मतदान केंद्रावर जाणे किंवा आणणे शक्य होत नाही. त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहतात. यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरातूनच मतदान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी चार प्रकारचे पथके तयार करण्यात आली आहेत. आचारसंहिता जाहीर होताच ही पथके कार्यान्वित झाली असून शासनाकडे तक्रार करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मतदार संघामध्ये १६ निवडणूक समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.











