न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- शहरात मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्माण करण्यास मंगल कार्यालये कारणीभूत आहेत. त्यांना मर्यादेच्या चौकटीत ठेवण्यासाठी शासनाने काही नियम व अटी त्यांच्यावर लादलेल्या आहेत. याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ चे तरतुदीनुसार व केंद्रीय हरित प्राधिकरणामार्फत एप्रिल २०१९ मध्ये दिलेल्या आदेशानुसार मंगल कार्यालयांना मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण करणा-या संस्था म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व मंगल कार्यालयांना त्यांचेमार्फत निर्माण होणा-या ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्यांचे स्तरावर करणेबाबत केंद्रीय हरित प्राधिकरणामार्फत आदेश देण्यात आलेले आहेत.
तसेच महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रण नियमावलीनुमार आवश्यक संख्येनुसार वॉश बेसिन, टॉयलेट ब्लॉक्स पुरुष व महिलांकरिता मुतारी बांधण्यात येत नसल्याचे अथवा त्या सुस्थितीत नसल्याचे आढळून आलेले आहे. बहुतांश कार्यालयांमध्ये वाहनांचे पार्कीगकरिता देखील पुरेशी व्यवस्था नसल्याचेही दिसून आलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यरत असलेल्या मंगल कार्यालयांना महानगरपालिकेमार्फत हेल्थ एनओसी देण्यात येते व त्या एनओसीने दरवर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक आहे.
परंतु, अनेक आस्थापनांमार्फत हेल्थ एनओसी शिवाय मंगल कार्यालये चालविण्यात येत आहेत. वरील बाबींची पूर्तता करणेकरिता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व मंगल कार्यालयांना नोटीस देण्यात आलेल्या असून, उक्त बाबींची पूर्तता करण्याकरिता सूचित करण्यात आलेले आहे. तरी याद्वारे शहरातील सर्व मंगल कार्यालयांना याद्वारे सूचित करण्यात येते की, त्यांनी उक्त सर्व बाबींची पूर्तता करावी अन्यथा त्यांचे आस्थापनेविरुध्द घनकचरा व्यवस्थापन अधिनियम, बांधकाम नियंत्रण नियमावली व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नियमाधीन कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे रॉय यांनी या पत्रकात म्हटले आहे.











