- पोलिसांच्या वाहनाला चोरट्यांच्या स्कार्पिओने ठोकले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १९ ऑक्टोबर २०२४) :- एटीएम मशिन फोडुन चोरी करणाऱ्या चोरट्यांचा महाळुंगे पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. स्कार्पिओ व रोख ११ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल तिथेच टाकुन चोरटे पसार झाले.
दरम्यान (दि. १९) रोजी मध्यरात्री ०२:०० वा चे सुमारास चाकणच्या बिरदवडी फाटा येथील हिताची कंपनीचे एटीएम.मशिन फोडुन त्यातील रक्कम चोरली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एक संशयीत काळ्या रंगाच्या स्कार्पिओने बिरदवडी-वाकी रोडने गेल्याचे पोलिसांना समजले. रोडलगत अंधारात वीटभट्टीजवळ संशयीत स्कार्पिओ थांबलेली दिसुन आली. पोलीस स्कार्पिओच्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच गाडीतील अनोळखी चोरटयांनी गाडी चालु करुन पोलीसांच्या गाडीस समोरुन धडक देवून पळ काढला. पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. बिरदवडी- वाघजाई फाटा नाकाबंदी करून गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरटयांनी स्कार्पिओ गाडी चाकणचे दिशेने वळविली. चाकणचे आंबेठाण चौकामध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी रोडवर कंटेनर अडवा उभा करुन रस्ता ब्लॉक केला. चोरटयांनी पुन्हा गाडी आंबेठाण बाजुला वळविली. आंबेठाण रोडलगतच्या झित्राइमळा येथे एका गल्लीमध्ये स्कार्पिओ गाडी घातली. चोरटयांना पुढे अरुंद गल्लीमधुन स्कार्पिओ नेणे शक्य न झाल्याने स्कार्पिओ मधील ५ ते ६ चोरटयांनी स्कार्पिओ, त्यातील ए.टी.एम. फोडीचे साहित्य गॅस कटर, सिलेंडर, एटीएम मशिन ओढण्यासाठीचे बेल्ट, व ए.टी.एम. मधील चोरलेले रोख १० लाख ५२ हजार रुपये असे जागीच सोडुन धूम ठोकली. चोरटयांचा परिसरात शोध घेण्यात आला मात्र, रात्रीचे अंधार व शेतीच्या मोकळ्या परिसराचा फायदा घेवुन चोरटे अंधारात पसार झाले.
महाळुंगे पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या जलद प्रतिसादामुळे चोरटे ए.टी.एम. मधील रक्कम घेवुन जावु शकले नाहीत. गंभीर गुन्हयास काहीअंशी प्रतिबंध करता आला. चाकण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धायगुडे चाकण पोलीस स्टेशन हे करत आहेत.











