- शंकर जगताप यांचा चिंचवड विधानसभेचा मार्ग मोकळा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२४) :- जगताप कुटुंबातील दीर-भावजयीमधील गृहकलह मिटला आहे. आमदार अश्विनी जगताप यांनी माघार घेतली असून, त्यांच्यासह माजी नगरसेवकांनी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे भाजपपुढील डोकेदुखी कमी झाली असून, शंकर जगताप यांचा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघावर निर्मितीपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व राहिले. २०२३ मध्ये त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच झाली होती. दोघांनीही उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षश्रेष्ठींनी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या.
कुटुंबाच्या वादात आमदारकी बाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अश्विनी जगताप यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. माजी नगरसेवकांसह आमदार जगताप यांनी शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची शिफारस पक्षाकडे केली. जगताप दीर-भावजय यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पुण्यात भेट घेतली. आमदार जगताप यांनी शंकर यांना उमेदवारी देण्याची शिफारस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
















