न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 03 नोव्हेंबर 2024) :- प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर तळवडेमधील करवीर, कोयना, इंद्रायणी या सोसायटीतील नागरिकांनी घरासमोरील चक्क खड्डयात रांगोळी आणि दिव्यांची आरास करून अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचीच शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष बसवराज कोळी, अशोक लोखंडे, संदीप लोखंडे, अंकुश बंडगर, सतीश परदेशी, रवी कचरे, संतोष सूर्यवंशी, संदीप गायकवाड, राजेंद्र परदेशी, सुरेश परदेशी, रजनी बोंडे, अनिता लोखंडे, सविता लोखंडे, सुलोचना बंडगर, अपर्णा मनीषा गायकवाड, जयश्री सूर्यवंशी, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण परदेशी, राजेंद्र परदेशी, बोराडे गुरुजी यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत शिवसेनेचे भोसरी विधानसभेचे विभागप्रमुख नितीन बोंडे माहिती देताना म्हणाले, ‘तळवडेमधील सोसायटी परिसरातील रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. गत महापालिका निवडणुकीआधी तब्बल सात वर्षांपूर्वी या रस्त्यांची उभारणी करण्यात आली होती. ड्रेनेज आणि पाण्याच्या पाईप लाईनच्या कामांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. सोसायटीमध्ये धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे.
महापालिका प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रभागाचा विकास हा खड्ड्यांमध्ये गेला आहे. याच्या निषेधार्थ करवीर, कोयना, इंद्रायणी या सोसायटीतील नागरिकांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खड्ड्यांमध्ये दिवे लावून महानगरपालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तसेच मुदतीत खड्डे न बुजविल्यास यापुढे मोठे जनआंदोलन उभे करू, असा इशारा पालिका प्रशासनास दिला आहे.












