- काटेंच्या माघारीमुळे चिंचवडमध्ये आता थेट तिरंगी लढत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२४) :- संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचं लक्ष लागलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज सोमवारी (दि. ४) रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महाविकास आघाडी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीचे शंकर जगताप, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यातच खरी लढत होणार आहे.
दरम्यान निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये तिन्ही उमेदवारांनी चिंचवड मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे या तिघांमध्ये पारडे जड कोणाचे? याचा कल येत्या २० तारखेला निवडणुकीच्या दिवशी मतपेटीत दिसणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाना काटेंची भेट घेऊन त्यांना उमेदवारी मागे घेण्याची गळ घातली होती. त्यामुळे नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. महायुतीकडून लढत असलेले भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना काही प्रमाणात त्यांच्या उमेदवारीमुळे फटका बसण्याची शक्यता होती. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर काटे यांनी अखेर त्यांचा उमेदवारी अर्ज आज माघारी घेतला आहे.
उमेदवार शंकर जगताप, भाऊसाहेब भोईर आणि राहुल कलाटे या तिघा उमेदवारांनी महापालिकेतील महत्वाची पदं भूषविली आहेत. या तिघांकडेही राजकीय व्युव्हरचना, खेळी आणि कौशल्य यांचा मिलाप घडविण्याची ताकद आहे. या सर्वांना निवडणुकीचा दांडगा अनुभव असून उच्चभ्रू तसेच तळागाळापर्यंत थेट जनसंपर्क आहे. त्यामुळे यंदाची चिंचवडची निवडणुक ही ‘घासून नव्हे तर ठासून’ होण्याचीच अधिक शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे.













