- दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येच मुख्य लढत..
- आताही आमदार बदलणार, की इतिहास घडणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२४) :- महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरांची मनधरणी केल्याने काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येथे आठ अपक्षांसह १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांच्यातच मुख्य लढत होणार आहे.
आतापर्यंत या मतदारसंघात एका वेळेस शिवसेनेला तर दोनवेळा राष्ट्रवादीला मतदारांनी पसंती दिली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात आमदार बदलण्याची परंपरा कायम आहे. त्यामुळे आताही आमदार बदलणार, की इतिहास घडणार, याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पिंपरी, भोसरी आणि चिंचवड हे विधानसभेचे तीन मतदारसंघ अस्तित्वात आले. हवेली तालुक्यातील पिंपरी या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमहापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १ ते ७, १३ ते १८, ३१ ते ३७, ५२, ५४ ते ५८, ६१ ते ६६, ७४ ते ७९, ८७ ते ९० सीएमई ९९९ या भागांचा समावेश होतो.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय वाल्मिकी सेना पक्ष, विदुथलाई चिरुथाईगलकाची या पक्षांनीही त्यांचे उमेदवार उतरविले आहेत. शिवाय आठ अपक्ष आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये येथे वंचित बहुजन आघाडी आणि बसपचाही मतदार असल्याचे दिसून आले आहे.
पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरीत भाजपचे अमर साबळे, राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये बनसोडे विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये बनसोडे विरुद्ध शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार आणि चंद्रकांता सोनकांबळे यांच्यात लढत झाली. यात चाबुकस्वार विजयी झाले. २०१९ मध्ये चाबुकस्वार आणि बनसोडे यांच्यात पुन्हा लढत झाली. यात चाबुकस्वार यांचा पराभव झाला. पुनर्रचनेनंतर झालेल्या तीन निवडणुकांत दोनवेळा बनसोडे तर एकदा चाबुकस्वार विजयी झाले. सलग एकाच उमेदवाराला मतदारांनी विजयी केले नाही. त्यामुळे आता मतदार काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरीतून निवडून आलेला आमदार सत्ताधारी पक्षाचा असतो.
२००९ मध्ये बनसोडे विजयी झाले. त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष सत्तेत होता. २०१४ मध्ये गौतम चाबुकस्वार निवडून आले. त्यावेळी शिवसेना सत्तेत होती. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा बनसोडे विजयी झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी सत्तेत आहे. मात्र, असे असतानाही पिपरीला मंत्रिपदाची संधी अद्याप मिळालेली नाही.












