न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) :- समाजातील सर्व स्तरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीनिमित्त भौगोलिक दृष्ट्या दुर्गम भागात विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असणाऱ्या लोकांबरोबर दिवाळी साजरा करण्याचा मानस बांधत यावर्षी इंगळून येथील आदिवासी (कातकरी) पाड्यावर आनंदाची दिवाळी साजरी केली. याचा आम्हाला खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी व्यक्त केली.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंदर मावळातील दुर्गम इंगळून गावातील आदिवासी (कातकरी) पाड्यावरील बांधवांबरोबर दिवाळी सण साजरा करत असताना ते बोलत होते. आगामी काळात येऊ घातलेल्या हिवाळ्यासाठी येथील १५ कुटुंबांना ब्लँकेटसह, दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणती आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी अजय पाटील, संदीप मगर, दीपक बागल, पांडुरंग खांडवी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाजीराव सुपे यांनी केले तर आभार भरत पवार यांनी मानले.











