- उमेदवारांच्या खर्च मर्यादेत १२ लाखांनी वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने यंदा उमेदवारांच्या खर्च मर्यादेत १२ लाखांनी वाढ करून ४० लाख रुपये केली आहे. लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना ९० लाखांची खर्च मर्यादा होती. या तुलनेत विधानसभा मतदारसंघ छोटा असल्याने त्यातील उमेदवारांना ४० लाखांची मर्यादा घालून दिली आहे.
निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आणि त्यांच्या पक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे. प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती विहित नमुन्यातच प्रसिद्ध करावी लागेल. पक्षांनी त्यांच्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागणार आहे. आयोगाने विहीत केलेल्या सी- १ नमुन्यात वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे उमेदवारांनी प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाख केली आहे. सभा, रॅली, जाहिराती यासारख्या प्रचाराच्या विविध माध्यमांवर उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात पैसा खर्च केला जातो. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चाबाबतचे तपशील काटेकोरपणे तपासले जातात.
पक्षांनी त्यांच्यासाठी विहीत केलेल्या सी-२ नमुन्यात वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धी द्यावी. प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीची तीन वेळा प्रसिद्धी द्यावी. प्रथम प्रसिद्धी ही उमेदवारी अर्ज माघारीच्या तारखेपासून पहिल्या चार दिवसांतच करावी. दुसरी प्रसिद्धी यापुढील पाच ते आठ दिवसांत करावी आणि तिसरी प्रसिद्धी नवव्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसांपर्यंत करण्याचे आदेश आहेत.

















