न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उद्या सोमवारी (दि. १८) संपणार आहे. त्या दिवशी सायंकाळी सहापर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी प्रचार सभेबरोबरच पदयात्रा व मोटारसायकल रॅली अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन होत असून. मोठ्या नेत्यांच्या सभाही होत आहेत. राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांसह नेत्यांची फौज शहरात ठाण मांडून आहे.
मतदानाची तारीख जवळ येत असल्याने पक्षांच्या प्रचाराचा वेग वाढला आहे. प्रचारादरम्यान राष्ट्रीय व राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभांचे आयोजन करून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या प्रचाराची यंत्रणा कार्यरत ठेवून मतदार मतदान करेपर्यंत आपली छाप पडावी, यासाठी सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करणारी यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून प्रचारफेरी तसेच भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी प्रचाराचा ‘सुपर सण्डे’..
• आज रविवारी सगळ्या पक्षांच्या शक्तिप्रदर्शनाला जोर येत आहे. सुट्टीचा दिवस असल्याने रैली, प्रदयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
• उमेदवारांचे कार्यकर्ते चाळी, इमारतींमध्ये घरोघरी जात आहेत. रविवारी असल्याने घरातील सगळीच माणसे भेटतात.
• प्रत्येकाशी संपर्क साधता येतो. तसेच, कार्यकर्तेही सुट्टी असल्याने अधिक वेळ देतात.
• यामुळे रविवारी उमेदवारांची, कार्यकर्त्यांची लगबग आहे.
दोन दिवसांत वातावरण ढवळून निघणार
भोसरी विधानसभा मतदारसंघात (रविवारी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. चिंचवड मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसह-महाआघाडीच्या स्टार प्रचारकांच्या कोपरा सभाही होणार आहेत.
यांच्या झाल्या सभा…
शहरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, नितीन गडकरी या महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर सभा घेऊन वातावरण ढवळून काढले.
















