न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२४) :- महिनाभरांपासून उडालेला प्रचाराचा धुरळा आज, सोमवारी (दि. १८) सायंकाळी सहा वाजता शांत होणार आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन आणि मावळ अशा चार मतदारसंघांत ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
बुधवारी (दि.२०) मतदान, तर शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अन्य राज्यस्तरीय पक्ष व अपक्षांनीही मतदारांच्या भेटीगाठीवर रविवारी भर दिला. सोमवारी अधिकृत प्रचार संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचाराला जोर येणार आहे.
पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत आहे. लगतच्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष अशी लढत होत आहे. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची, मतदारसंघात तर पिंपरी भाजपच्या नगरसेवकाची बंडखोरी आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंतचा वेळ जाहीर प्रचारासाठी आहे. त्यानंतर रात्री साम- दाम-दंड-भेद नीतीचा वापर होण्याची शक्यता आहे. निवडणूक यंत्रणेला चकवा देऊन मते पक्की करण्यासाठीच्या घडामोडी या काळात होतात. त्यासाठी काही उमेदवारांनी खास कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे.
















