न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- चिंचवड हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्येचा विधानसभा मतदारसंघ असून, सामान्य, कष्टकरी कामगार, मध्यमवर्गीय असा संमिश्र मतदार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये दीड लाख मतदार वाढले. एकूण मतदारांत ऐंशी टक्के बाहेरगावचे आणि वीस टक्के स्थानिक नागरिक आहेत. बाहेरगावचे आणि नवीन मतदार निर्णय ठरणार आहेत.
पुनर्रचनेमध्ये हवेली, मुळशी विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिळून चिंचवड मतदारसंघ तयार झाला. पिंपरी-चिंचवड शहरात तीन मतदारसंघ आहेत. मात्र, शहराच्या सत्तेची सूत्रे अजूनही गावकी- भावकीकडे असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहराच्या सत्तेची सूत्रे चिंचवडकडे असल्याचे दिसून येते. उपनगरांचा भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने नवमतदार कोणाला पसंती देणार, यावर निर्णय ठरणार आहे.
या मतदारसंघांमध्ये काळेवाडी, रहाटणी, नवी सांगवी आणि सांगवी, थेरगाव, रहाटणी, वाल्हेकरवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार-कष्टकरी मतदार आहे. आयटीनगरी जवळच असल्याने पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकडचा काही भाग, किवळे, रावेत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी अभियंत्यांचे वास्तव्य आहे. गावठाणांच्या परिसरामध्ये शेतकरी, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय असे या मतदारसंघाचे व्यक्तिमत्त्व आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यातील विविध भागातून नागरिक वास्तव्यास आले आहेत. या भागात गेल्या पाच वर्षात दीड लाख मतदार वाढले आहेत. ही मतदारसंख्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहे.

















