न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महापालिकेतर्फे विंटेज कार व बाईक रॅली तसेच, प्रदर्शनाचे आयोजन रविवारी (दि.१७) करण्यात आले. कोकणे चौक आणि नेहरूनगर येथील एचए कंपनी मैदान परिसरात रॅली काढण्यात आली. प्रदर्शनातील दुर्मिळ व जुनी वाहने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रॅलीची सुरूवात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. विंटेज कार प्रदर्शनाचा हेतू मतदारजागृती करून शहरातील मतदानाचे प्रमाण वाढावे, हा असल्याचे सांगून नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रतिभा महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने मतदान जनजागृतीसाठी एकपथनाट्य कार्यक्रम आयोजित केला.
पाप्रसंगी चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीजचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, सीईओ राजेंद्र कांकरिया, प्राचार्य अरुण कुमार वाळुंज, उपप्राचार्य क्षितिजा गांधी, आय क्यू एसी कॉर्डिनेटर जयश्री मुळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी शुकलाल कुंभार व सुप्रिया गायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सादर केला. त्यामध्ये मतदानाचे महत्त्व, मतदाराची जबाबदारी आणि लोकशाहीतील मतदानाचे स्थान याबाबत संदेश देण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान, विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे महत्त्व स्पष्ट करणारे विविध सजीव आणि प्रेरणादायक प्रसंग सादर केले. पथनाट्याने उपस्थितांना मतदान प्रक्रियेतील अडचणी आणि त्यावर उपाय कसे असू शकतात हे दाखवले. या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात प्रमुख मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि जनतेला मतदानाच्या अधिकाराची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली.
या पथनाट्याचा सकारात्मक प्रतिसाद पाहून महाविद्यालयाने भविष्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन अधिक प्रमाणात करण्याची इच्छा व्यक्त केली.

















