न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२४) :- मोबाइलच्या अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी मनुष्यबळाने निर्धारित कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरू नये, असा आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) लागू करण्यात आला आहे. बाह्यस्रोत यंत्रणेमार्फत घेतलेल्या कंत्राटी मनुष्यबळाला संबंधित आदेश लागू असून, त्याची अंमलबजावणी कंत्राटी एजन्सीने सुरू केली आहे.
पीएमआरडीए कार्यालयात ४०७ पदांचा आकृतिबंध मंजूर झालेला आहे. या मंजूर आकृतिबंधातील प्रतिनियुक्तीसह आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीची पदे शासनाकडून उपलब्ध होईपर्यंत तसेच सरळसेवेच्या पदांची बिंदू नामावली मंजूर होऊन सदरील पदे एमपीएससी व जिल्हा निवड समितीमार्फत भरती करण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. संबंधित पद भरती होईपर्यंत पीएमआरडीएने बाह्यस्रोत एजन्सी नियुक्त करून त्यांच्यामार्फत कंत्राटी मनुष्यबळ नियुक्त केले आहे.
पीएमआरडीएमध्ये कार्यरत मनुष्यबाळाकडून कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर होत असल्याने कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. गोपनीयतेचा भंग होऊ नये कार्यालयीन वेळेत संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर करण्यास बंदी घातली आली आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी पूर्णवेळ कामकाजात व्यस्त राहणार असल्याने कार्यालयीन कामकाजात अधिक सुरळीतपणा येण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

















