न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२४) :- मावळ तालुक्यातील प्रसिध्द बैलगाडा मालक पंडीत जाधव (वय ५२ वर्षे रा. मु.जाधववाडी डॅमजवळ, पो. नवलाख उंब्रे ता. मावळ) यांच अपहरण करून खून केला. त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावुन खंडणीचा बनाव करण्यात आला होता. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक, गुन्हे शाखेने याप्रकरणी आरोपीस ताब्यात घेवून गुन्ह्याची उकल केली आहे.
सुरज मच्छिंद्र वानखेडे (वय २३ वर्षे सध्या रा. पंडीत जाधव यांचे खोलीत, मु. जाधववाडी, पोस्ट-नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) व त्याचा मित्र रणजीत कुमार (रा बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पंडीत जाधव यांच्या व्हाटसअॅप नंबरचा वापर करुन त्यांच्या नातेवाईकांकडे ५० लाख रुपयाची मागणी हे दोघे आरोपी करत होते. सुरज ला तो गावी पळुन जाण्याच्या तयारीत असताना बधलवाडी येथुन पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या चौकशीवरुन तो व त्याचा मित्र रणजीत याच्या मदतीने ५० लाख रूपयाची खंडणी मागीतल्याचा बनाव करुन अपहरण केले. (दि. १४) रोजी रात्री तळेगाव एमआयडीसी परीसरात दोरीने गळा आवळून जाधव यांचा खुन केला. मयत यांच्या फॉर्चुनर गाडीमध्ये त्यांचा मृतदेह टाकुन वहागाव ता. खेड येथील डोंगरावर तो मृतदेह जाळुन त्याची विल्हेवाट लावली. गाडी पुन्हा मयत इसमाच्या घराच्या परीसरात लावली. तपासात निष्पन्न आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले पाच सिमकार्ड व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.















