- गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वसुलीत शंभर कोटींचा फरक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२४) :- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात, पिंपरी- चिंचवड महापालिकेला शहरातील मालमत्ताकराद्वारे ५४० कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एकूण तीन लाख ७९ हजार मालमत्ताधारकांनी हा करभरणा केला आहे. त्यात सर्वाधिक ३६२ कोटी ७४ लाख रूपयांची बिले त्यांनी ऑनलाइन भरली आहेत.
महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे शहरातील ६ लाख ३३ हजार २९४ मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी सर्वाधिक ५ लाख ४१ हजार १६८ निवासी मालमत्ता असून ५७ हजार ७३३ मालमत्ता बिगरनिवासी आहेत. औद्योगिक ४ हजार ५६३, मोकळ्या जमिनी ११ हजार ३२३, मिश्र १६ हजार १ आणि इतर २ हजार ५०६ मालमत्ता आहेत. आर्थिक वर्षातील (१ एप्रिल ते २८ नोव्हेंबर) पहिल्या नऊ महिन्यात एकूण ५४० कोटी रूपयांचा मालमत्ताकर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आतापर्यंत एकूण ३ लाख ७९ हजार मालमत्ताधारकांनी बिलभरणा केला आहे. थकबाकीची रक्कम ८९ कोटी ८० लाख रूपये आहे.
तर, ४४७ कोटी ६१ लाख रूपये ही चालू मागणी आहे. त्यात ३६२ कोटी ७४ लाख रूपये ऑनलाइन जमा झाले आहेत. आयटीजीएसआणि एनईएफटीद्वारे ४२ कोटी, रोखीने ४१ कोटी ६६ लाख तर धनादेशाद्वारे ३७ कोटी ९७ लाख रूपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. एकूण ३५ कोटी ४३ लाखांचे समायोजन करण्यात आले आहे. ८३ कोटी ६० लाखांचा सर्वाधिक मालमत्ताकर वाकड विभागीय कार्यालयाकडे जमा झाला आहे. पाठोपाठ ५० कोटी ६७ लाखांचा कर थेरगाव कार्यालयात तर, चिखलीतून ४२ कोटी ७३ लाख, पिंपरीगावातून ३७ कोटी ८२ लाख आणि भोसरीतून ३७ कोटी ६२ लाख रूपयांचा कर जमा झाला आहे. मागील वर्षी पहिल्या ९ महिन्यांत एकूण ६३३ कोटी रूपये जमा झाले होते. यंदा त्या तुलनेत कमी वसुली झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, एकूण ८६२ कोटी ७० लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. निवडणुका आचारसंहितेमुळे ती प्रक्रिया थांबली होती. तसेच, थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची कारवाईही सुरू करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकसभा तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी कर संकलन विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज जवळजवळ ठप्प पडले होते. त्याचा परिणाम वसुलीवर झाला आहे. मागील वेळेस मालमत्ताधारकांकडून उपयोगकर्ता शुल्क वसुल करण्यात आले होते. ते रद्द केल्याने ती रक्कम यंदा दिसत नाही. निवडणूक कामकाजातून सर्व कर्मचारी कामावर पुन्हा रूजू झाल्याने वसुलीचे काम वेगात केले जाणार आहे. त्याबाबत नियोजन केले आहे. – अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त – कर संकलन विभाग पिंपरी चिंचवड मनपा…












