- प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार रंगात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०८ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होत असून प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. या प्रभागातील भाजपच्या अधिकृत उमेदवार कुंदाताई संजय भिसे यांनी प्रचाराची धुरा स्वतः हाती घेत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्यामुळे परिसरात भाजपबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी (दि. ०७) कुंदाताई भिसे यांनी भाजपचे उमेदवार शत्रुघ्न काटे, अनिताताई काटे आणि संदेश काटे यांच्यासह गणेश पार्क, दीपमाला, साई हाईनेस, लक्ष्मी वृंदावन आणि वरून पार्क या सोसायटी परिसरात भेटी दिल्या. या भेटींमध्ये सोसायटीतील नागरिक, पदाधिकारी आणि कुटुंबीयांशी थेट संवाद साधण्यात आला.
प्रचारादरम्यान प्रभागातील नागरी सोयी-सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, पार्किंग तसेच भविष्यात या सुविधांमध्ये कशी अधिक सुधारणा करता येईल, यावर मतदारांशी मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली. नागरिकांनीही आपल्या समस्या आणि अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या.
कुंदाताई भिसे यांनी उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य, गरजूंसाठी राबविलेले उपक्रम आणि भाजपची विकासाभिमुख भूमिका यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. “विकासासाठी सातत्याने काम करणारा पक्ष म्हणून भाजपवर आमचा विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.












