- नागरिकांचा हजारोंच्या संख्येने सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. ०८ जानेवारी २०२६) :- भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र. २६ चे उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत हजारो नागरिक, भाजप कार्यकर्ते, महिला व युवक सहभागी झाले होते. या निवडणुकीत हे पॅनेल पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असल्याचा स्पष्ट संकेत या पदयात्रेतून देण्यात आला.
विशालनगरमधील शेल पेट्रोल पंपापासून पदयात्रेला सुरवात झाली. डीपी रस्त्यावरून ती काढण्यात आली. पक्षाचे झेंडे व घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अनेक ठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे जोरदार स्वागत केले. उमेदवारांचे तोंड गोड करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महिलांची मोठी उपस्थिती हे प्रचाराचे विशेष आकर्षण ठरले. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.
सामाजिक हित जपणारे उमेदवार…
भाजपचे हे उमेदवार सामाजिक हित जपणारे, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या समस्या यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा जाहीर पाठिंबा..
प्रभागाच्या चारही उमेदवारांचे आजपर्यंतचे लोकोपयोगी कार्य पाहून आणि त्यांचे भविष्यातील विकासाचे व्हिजन लक्षात घेऊन राष्ट्रीय बंजारा परिषदेने पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. तसेच, त्याबाबतचे पत्रक उमेदवारांना दिले.
यावेळी परिषदेचे राज्यसंघटक रावसाहेब चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड, रणजित पवार, अविनाश राठोड, कैलास चव्हाण, अभिजीत चव्हाण, ज्योती राठोड, आकाश राठोड, लालभाऊ चव्हाण व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
उदरनिर्वाहाच्या दृष्टीने देशातील विविध भागातील बंजारा समाज बांधव या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. सामाजिक स्तरावर त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी हे उमेदवार प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा त्यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.












