न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२६) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून धमाकेदार साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे व लोककलेचे दर्शन घडवणाऱ्या या नृत्यातुन भूपाळी, वारकरी दिंडी, जोगवा, गोंधळ, कोळी , शेतकरी, पोवाडा आदी लोकनृत्य प्रकारांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, जोशपूर्ण ताल आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक अनिल भांगडीया यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पुणे विभागाचे शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी भूषविले. विशेष उपस्थिती कॅप जेमिनीचे संस्थापक सदस्य हिरामनी गवई यांची होती. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी सादरीकरणासाठी प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.वर्षा निगडे आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून प्रतिभा महाविद्यालयाचे ,विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संस्थेचे संचालिका डॉ. तेजल शहा, बी एड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, प्रतिभा वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, प्रतिभा एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा इंटरनॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका डॉ. वृंदा जोशी, प्रतिभा महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद, मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी केले तर, आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वर्षा निगडे यांनी केले.












