न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२६) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलितन्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये नवीकरणीय ऊर्जा स्रोत व जागतिक तापमानवाढ या महत्त्वाच्या विषयावर माहितीपर व मार्गदर्शक सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारसाठी अल्कोहेम इंडस्ट्रियल प्रोजेक्ट कन्सल्टंट्स अँड सायन्सा रिन्यूएबल एनर्जी कन्सल्टंट्सचे मुख्य सल्लागार बी. एच. श्रीकांत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. माजी प्राचार्य वसंत चाबुकस्वार (वाडिया कॉलेज), शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार तसेच शाळेचे उपमुख्याध्यक सचिन कळसाईत व शिक्षक उपस्थित होते.
श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची सविस्तर माहिती दिली. या समस्यांवर मात करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव इंधन यांसारख्या ऊर्जास्रोतांचा वापर केल्यास पर्यावरणाचे संरक्षण करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकार नवीकरणीय ऊर्जेचा वापर कसा प्रोत्साहित करत आहे तसेच लोकांनीही हे ऊर्जा स्रोत स्वीकारल्यास पृथ्वीवरील अपुनर्नवीकरणीय ऊर्जास्रोत संपुष्टात जाण्यापासून कसे वाचवता येईल, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. भविष्यातील पिढीसाठी पृथ्वी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असा महत्त्वाचा संदेशही या वेळी देण्यात आला.
या सेमिनारमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदवला. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारल्यास जागतिक तापमानवाढीचा धोका कमी करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजले.
अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. सेमिनारच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. शाळेच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.












