- रेल्वे विभागाकडून दोन्ही उड्डाणपुलांची नव्याने निर्मिती करण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२४) :- पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल तसेच, चिंचवड स्टेशन येथील पणे-मुंबई जुन्या महामार्ग व चिंचवड गावास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. ते दोन्ही पूल पाडा, असे पत्र रेल्वे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेस पाठविले आहे. त्यामुळे महापालिका हे पूल पडून नवीन पूल तयार करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्ग आणि पिंपरी गावास जोडणारा आणि पुणे लोणावळा लोहमार्गावरील पिंपरी येथील उड्डाणपूल हा शहरातील सर्वात पहिला पूल आहे. या इंदिरा गांधी पुलाचे आयुष्य संपले असून, बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पूल वाहतुकीस बंद करा. पूल पाडून टाका, असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेस तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या कार्यकाळात पाठविले होते. शहरातील दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने महापालिकेने पुलाचे स्ट्रॅक्चर ऑडिट केले. त्यानंतर त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम सुमारे २ ते ३ वर्षे सुरू होते. त्यामुळे त्याचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.
तसेच, शहरातील चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामास ४७ वर्षे झाली आहेत. ते बांधकाम धोकादायक झाले असून, तो पूल पाडा, असे पत्र रेल्वेने महापालिकेस नुकतेच पाठविले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. जुना पूल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतूक समस्या अधिक गंभीर होणार आहे.
चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलास ४७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे पुलाचे बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पूल पाडावा, असे रेल्वेचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे. यापूर्वीच पिपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल पाडावा, असे रेल्वेचे पत्र आले आहे. त्या पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या दोन्ही पुलाचे काय करायचे यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका…












