न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव वार्ताहर (दि. ०१ डिसेंबर २०२४) :- देहू नगरपंचायत प्रशासनाकडून नगरपंचायत हद्दीतील सुमारे ३५ अनधिकृत फ्लेक्स, बॅनरवर कारवाई करीत शुक्रवारी (दि. २९) ते हटविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उमेदवारांचे अभिनंदन करणारे, शुभेच्छा देणारे तसेच मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानणारे बॅनर नगरपंचायत हद्दीत लावण्यात आले होते. तसेच विविध व्यवसाय, उद्घाटने यांच्या जाहिरातींचे फ्लेक्स नगरपंचायत प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृतपणे लावण्यात आले होते.
नगरपंचायतीने निश्चित केलेल्या ठिकाणावर जाहिरात फलके, बॅनर लागलेले नसल्याने शहराच्या विपुद्रीकरणात भर पडली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशान्वये मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाचे सुरेंद्र आंधळे, धनंजय नायकवडे, कर विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे, नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
डॉ. आंबेडकर चौक ते मुख्य प्रवेशद्वार जवळील तसेच देहू-देहूरोड मार्ग, परंडवाल चौक आणि देहू आळंदी मार्ग काळोखे चौक दरम्यानचे सुमारे ३५ फ्लेक्स काढण्यात आले. तसेच उर्वरित ठिकाणचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनरवर सोमवारी कारवाई करण्यात येणार आहे.












