न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- जागतिक परिचारिका दिनानिम्मित पिपंरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या परिचारिकाचां पिपंरी चिंचवड युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना युवा सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी मनोगत व्यक्त केले की, आजच्या धावपळीच्या काळात सर्वांना तातडीची सेवा हवी असते. डॉक्टरांनंतर रुग्णाची सेवा जर कोणी करत असेल तर त्या परिचारिका. रुग्णांना सेवा अतिशय चोखपणे देण्याचे काम परिचारिका करत असतात. पण तरीही शासकीय रुग्णालयात खुप काम करूनही, त्यांच्यावर रुग्णाचे नातेवाईक व राजकीय मंडळी काम करत नसल्याचे खोटे आरोप करत असतात. पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून, मोठ्या आदराने रुग्णसेवा करत असतात.
जागतिक माता दिवस व परिचारिका दिवस एकत्र आहे. यात माता आणि परिचारिका दोघीही प्रेमाचा आणि वात्सल्याचा झरा अविरत तेवत ठेवत समान कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळे त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. परिचारिकानां काही अडचण निर्माण झाल्यास युवासेना नेहमीच परिचारिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे सांगून जागतिक परिचारिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेनेच्या वतीने प्रमुख मेट्रन परिचारिका मोनिका चव्हाण, असिस्टंट मेट्रन माया गायकवाड, पिपंरी चिंचवड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे, सुपर सिस्टर पुष्पा लाड, विजया रोकडे व स्मिता शेटे यांचा व सर्व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, पिपंरी विधानसभा युवा अधिकारी अभिजित गोफण, पिपंरी विधानसभा युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, चिंचवड युवती अधिकारी शर्वरी जळमकर, नीलेश हाके, निखिल येवले पाटील, वंदना खंडागळे, सन्नी कड, पुरू पाटील, ज्येष्ठ शिवसेनिक बाबा वानखेडे आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
आभार व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या प्रमुख मेट्रन मोनिका चव्हाण म्हणाल्या की, आमच्या कामाचे कौतुक करणारी लोकं फार कमी असतात. आमच्या कामाच्या प्रति असलेल्या तळमळीची पिपंरी चिंचवड युवासेनेने जाणीव ठेवत आमचा सत्कार केल्यामुळे आम्हाला अजुन चांगली रुग्णसेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.















