न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- महाराष्ट्र शासन नियुक्त राज्याचे स्वच्छता दूत पद्मश्री श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानामुळे उद्योगनगरीने अभुतपुर्व स्वच्छतेचा अनुभव घेतला.
प्रतिष्ठानचे श्री. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे २४७१ श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या अभियानांतर्गत सकाळी सात ते दहा या वेळेत पिंपरी चिंचवड शहरातील सहाही प्रभागातील मुख्य रस्ते, मैदान, उद्यान, शाळा, सार्वजनिक ठिकाणे, नदी परिसर आदी भागात स्वच्छता करण्यात आली. यावेळी शहरातील सुमारे ४१,२१० चौ.मी. परिसरातील आणि २०७ कि.मी. लांबीच्या दुतर्फा रस्त्यांवरील तब्बल २०७ टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सहभागी झालेल्या श्री सदस्यांना प्रतिष्ठानच्या वतीने मास्क आणि हातमोजे उपलब्ध करून देण्यात आले होते. स्वच्छतेसाठी लागणारी साधने श्री सदस्यांनी स्वखर्चातून आणले होते. तसेच गोळा केलेला कचरा वाहून नेण्यासाठीही श्री सदस्यांच्या वैयक्तिक वाहनांचा वापर करण्यात आला.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अशाप्रकारच्या महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येते. मनुष्याच्या जीवनात स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्त्व असून किमान आपण राहतो तो परिसर स्वच्छ ठेवणे हे शहरातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे रस्ते, मोकळी मैदाने अथवा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी कचरा न टाकता आपल्या शहराचे सौंदर्य अबाधित ठेवावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, या महास्वच्छता अभियानासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आणि श्री सदस्यांचे विशेष कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले.















