न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२४) :- आधीच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीकर परदेशी हे आता मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव असतील.
पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस, एमडी असे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. यवतमाळ, अकोला आणि नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. नांदेडमध्ये असताना त्यांना जलसंवर्धनासाठी पंतप्रधान पुरस्कार मिळाला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेचे ते आयुक्तही राहिले आहेत. २०१५ मध्ये पंतप्रधान कार्यालयात रुजू झाले.
ग्रामीण, नागरी, जल, कृषी, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील धोरणांची आखणी व संनियंत्रण अशी जबाबदारी त्यांनी ५ वर्षे सांभाळली. परदेशी यांनी २०२१ मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून लोकप्रशासनात पदव्युत्तर पदवी संपादन केली. जॉन्स हापकिन्स विद्यापीठाने २०२२ मध्ये त्यांना ‘मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ’ प्रदान केले.











