- प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२४) :- नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुण कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. ५) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास काळेवाडी च-होली येथे घडली. याप्रकरणी अवघ्या १२ तासांच्या आता पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने एकाला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
सचिनकुमार लखीदर राय (वय २३, रा. बंगरी, जि. मुझफ्फरपूर, बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गौतम रामानंद राय (वय २२, रा. तेजस रेसिडेन्सी, मंगलनगर, वाकड, मूळ गाव मु, बंगरी, पो. मरवन,ता. काटी, जि. मुजफ्फरपूर, राज्य बिहार) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर त्याचा अल्पवयीन साथीदार (वय १७ वर्षे ६ महिने, रा. मोहीतेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली येथे सचिनकुमार राय याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणीविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता त्यावरून संशयित आरोपी गौतम राय याचे नाव निष्पन्न केले.
मयत सचिनकुमार राय याचे संशयित आरोपीच्या नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला होता. या कारणावरून नातेवाईक महिलेने घरही सोडले होते. त्यामुळे सचिनकुमार याला धडा शिकविण्यासाठी त्याचा खून केल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले. खंडणीविरोधी पथकाने आरोपीला दिधी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिस हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून आणि सहायक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून काळाखडक, वाकड येथून पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.











