न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- काही दिवसांपूर्वी टेस्ट ड्राइव्ह चे कारण सांगून चोरलेल्या कारचे आरोपी यांचा पोलिसांनी सखोल तपास केला असता आरोपींना चोरलेल्या कारमधून सोने लुटून पळून जायचे होते, ही गंभीर बाब उजेडात आली आहे.
थोडक्यात घटना अशी की, उमेश चौधरी यांचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच त्यांच्याकडे १२ लाखांची अलिशान कार विक्रीसाठी आली होती. चोरट्यांनी कारची टेस्ट ड्राइव्ह घेण्याचे बहाण्याने २८ मार्च रोजी कार चोरून नेली. चोरीला गेलेली कार २९ एप्रिलच्या रात्री देहरोड पोलिस ठाण्यातील एका फौजदाराने तळवडे परिसरात अडवली.
कार व चालकाला घेऊन ते पोलिस ठाण्यात आले. या सर्व प्रकारानंतर शुक्रवारी (दि. ३) रोजी ही कार चौधरी यांची असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी कार चोरीचा योग्य गुन्हा दाखल केला. दत्तात्रय आण्णा डुबे (वय ३१, रा. मोरेवस्ती, चिखली), दत्तात्रय पांडुरंग रंदवे (वय २८, रा. कांदेवस्ती इंदोरी, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडे तपास केला असता, व्यवसायात नुकसान झाले. त्यामुळे पैशांची अडचण भासू लागली. पैशांची गरज पूर्ण कारण्यासाठी भिगवण, बारामती परिसरात सोने चोरी करायचे. चोरी केल्यानंतर कारमधून पळून जायचे. यासाठी त्यांनी कार चोरली होती, असे तपासात स्पष्ट केले आहे.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, स्वामिनाथन जाधव, रमेश मावसकर, सतीश ढोले, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, प्रवीण मुळूक, सोमनाथ दिवटे, विलास केकाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.















