न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धोरणांच्या विरोधात आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर आज सोमवार (दि. १३) रोजी अजमेरा कॉलनी व परिसरातील सोसायट्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात शिक्षण मंडळ माजी सभापती अर्जुन ठाकरे, वीणा सोनवलकर, आशा काळे व सोसायटीतील रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापालिकेने या परिसरातील आरक्षण क्रमांक ७७ आणि ७९ वरील जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणि पंतप्रधान आवास योजनेनुसार गृहप्रकल्प उभारणी निश्चित केली आहे. परंतु, पूर्वी या जागेवर महापालिकेने वॉर्ड सेंटर आणि उद्यानासाठी जागा आरक्षित केली होती. अंतरीक्ष आणि सागर या दोन्ही सोसायट्यांच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेवर महापालिकेने योजनेनुसार कामही चालू आहे.
त्यामुळे अजमेरा कॉलनी व अंतरीक्ष, सागर, ग्रीन फिल्डस सोसायटी, मनिष गार्डन, मेगा हाईट्स आणि स्वप्ननगरी या सोसायट्यामधील रहिवाश्यांनी या प्रकल्पांना विरोध दर्शविण्यासाठी महापालिकेवर मोर्चा नेऊन कामबंद करण्याची मागणी केली.
आमदार महेश लांडगे यांनी हस्तक्षेप करीत शहर अभियंता राजन पाटील यांना तात्काळ कामबंद करण्याचे आदेश दिले व पुढील प्रस्तावित बैठकीत निर्णय होईपर्यंत काम स्थगित ठेवण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना स्थानिकांची मते, समस्या जाणून घेण्यासही त्यांनी सांगितले.















