- आ. अमित गोरखे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२४) :- पुणे-लोणावळा रेल्वे महामार्गावरील चिंचवड येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. येथे वर्षानुवर्षे राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील चिंचवड स्थानकाजवळील सर्व्हे १७५, १७६ येथील नागरिकांना अतिक्रमण हटविण्याबाबत सहायक विभागीय अभियंता (दक्षिण) सुशांत कुमार यांनी सूचना केल्या आहेत. त्यामुळे आनंदनगर चिंचवड येथील नागरिकांनी आमदार अमित गोरखे यांची भेट घेतली. त्यावर गोरखे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक इंदू राणी, ब्रिजेशकुमार सिंग यांना संपर्क साधला.
आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘आनंदनगर चिंचवड येथे ५० वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे आणि त्यानंतर यांचे अतिक्रमण काढावे, अशा नागरिकांच्या भावना आहेत, त्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ यामधून तोडगा काढू, असे संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.