न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या हाउसिंग सोसायट्यांना कंपोस्ट खत प्रकल्प राबविणे सरकारने बंधनकारक केले आहे. जूनच्या १ तारखेपर्यंत प्रत्येक सोसायटी व संस्थांनी सदर प्रकल्प सुरू करणे गरजेचे आहे. त्यानंतर १५ जूनपासून प्रत्यक्ष तपासणी मोहिम हाती घेतली जाणार आहे. प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या सोसायटी व बसस्थाने संस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . के . अनिल रॉय यांनी सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील दररोज १०० किलो व त्यापेक्षा अधिक ओला कचरा निर्माण होणाऱ्या ८७६ हौसिंग सोसायट्या तसेच इतर संस्थांना पिंपरी चिंचवड महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित सोसायट्यांना १ जूनपूर्वी ओला कचरा स्वतः जिरवून त्यापासून खत निर्मितीसाठी कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प निर्माण करणे बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार ओला, सुका व घरगुती घातक कचरा वेगवेगळा करणे बंधनकारक आहे. तसेच १०० किलो ओला कचरा निर्माण करणा-या आणि ५ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या संघटित संस्था व समुदायांना हा नियम लागू आहे. त्यामध्ये एकूण ६८ व त्यापेक्षा अधिक सदनिका असलेल्या हौसिंग सोसायट्या, हॉटेल व्यावसायिक, खानावळ, हॉस्टेल, उपहारगृह, शाळा, महाविद्यालय, भाजीमंडई, कृषी बाजार समिती यांचा समावेश आहे. या संस्थांना सप्टेंबर २०१८ पर्यंत कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.











