न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- अंघोळीची गोळी संस्था आयोजित ‘चला मामाच्या गावाला जाऊया’ या उन्हाळ्यातील उपक्रमांतर्गत शिर्डीच्या साई आश्रम या संस्थेतील २५ मुलांनी शहरातील विविध ठिकाणांना भेट दिली. यात पाचवी ते दहावीच्या मुलांचा समावेश होता.
मुलांनी सिंहगड किल्ला, राजीव गांधी सर्पोद्यान, अप्पू घर, सायन्स पार्क या ठिकाणांना भेट देत माहिती घेत पर्यटनाचा आनंद लुटला. सायन्स पार्कला मुलांनी भेट दिली तेव्हा त्यांना पुस्तकातील प्रयोग प्रत्यक्षरीत्या अनुभवता आले. पुस्तकातील इतिहासामुळे माहीत झालेला सिंह मुलांनी प्रत्यक्ष चढल्यानंतरचा अनुभव घेतला.
अंघोळीची गोळी संस्थेचे सदस्य सचिन काळभोर म्हणाले, ‘चला मामाच्या गावाला जाऊया’ या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, यापूर्वी बीड जिल्हा तसेच अकोला तालुक्यातील मुलांनी शहराला भेट दिली आहे. या मुलांनी ६ दिवस या उपक्रमाचा आनंद घेतला.
ऐतिहासिक, उद्यान, संग्रहालय, शैक्षणिक स्थळांच्या भेटीमुळे मुलांनी सुटीच्या आनंदाबरोबर नवी माहिती घेतली. या उपक्रमामुळे अनाथ मुलांना सुटीतील मजा अनुभवता यावी आणि त्यांना स्वप्न पाहण्याची दृष्टी मिळावी असा संस्थेचा प्रयत्न असल्याचे अंघोळीची गोळी संस्थेचे प्रमुख माधव पाटील यांनी सांगितले.


















