न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२४) :- नो पार्किंग वाहनांवर कारवाई करण्यासाठी चिंचवड विभागातील महिला वाहतूक पोलीस ड्युटीवर हजर होत्या. दरम्यान चिंचवड गावातील हेरिटेज प्लाझा येथे नो पार्किंगमधील दुचाकी ज्युपिटर गाडी ही टोइंग करून टेम्पोमध्ये टाकली. हे पाहून या टू व्हीलरचा चालक तिथे आला. त्याने ‘माझी ही गाडी आहे, मला परत द्या, मी दंड भरू शकत नाही’, असे म्हणत महिला वाहतूक पोलिसाशी वाद घातला.
टेम्पो चालक आणि मदतनीसाशी बाचाबाची करीत महिला वाहतूक पोलिसाला अश्लील शिवीगाळ केली. त्यावर महिला वाहतूक पोलीस नो पार्किंगमध्ये हे वाहन पार्क केले आहे. तसेच तुम्ही वाहतूक विभागाच्या ऑफिसला या, तुम्ही तिथे दंड भरून तुमची गाडी घेऊन जा, असे त्यांना म्हणाल्या. ते न ऐकता आरोपीने साथीदाराच्या मदतीने टेम्पो थांबवून पुन्हा त्यांना शिवीगाळ केली. रस्त्यावरून येणारे जाणारे लोक तिथे जमले होते. आरोपींनी महिला पोलिसाच्या युनिफॉर्मच्या पॅन्टच्या मागील खिशातून हाताने मोबाईल काढून त्यांचा मोबाईल खाली फेकून दिला. त्यामुळे त्यांच्या मोबाईल स्क्रीनचे नुकसान झाले आहे. आरोपींनी महिला वाहतूक पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला आहे. हा प्रकार (दि.१४) रोजी दुपारी १२.१५ वा. चे सुमा हेरीटेज प्लाझा समोर, लिंकरोड, चिंचवड येथे घडला.
याप्रकरणी सुप्रिया रामदास बो-हाडे (पोलीस हवा १७८७, नेमणुक चिंचवड वाहतुक विभाग) यांनी आरोपी १) दुचाकी गाडी क्रं. एम एच १२ क्यू डी ५३३८ या गाडीचे चालक मिलिंद राजेंद्र पवार (वय-३३ वर्षे, काम- व्यापार, रा- गवळी वाडा दर्गा वसाहत खडकी), २) महिला आरोपी (वय २८ वर्षे, खाजगी नोकरी एलप्रो मॉल चायनिज शॉपमध्ये रा वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी ५०० / २०२४ भारतीय न्याय सहिंता कलम १३२,१२१ (१) २१८, २२१, ३२४ ३५२,३ (५) प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि करंबळकर पुढील तपास करीत आहेत.











