- पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी ‘यशदा रिअल्टी ग्रुप’ आणि ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ चा पुढाकार..
- पुण्यासह राज्यभरातून धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १५ डिसेंबर २०२४) :- पिंपळे सौदागरनगरीत ‘यशदा पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन’ (PCHM) स्पर्धा रविवार (दि. १५) रोजी उत्साहात पार पडली. पहाटे साडेपाच वाजल्यापासून मॅरेथॉनमधल्या वेगवेगळ्या शर्यतींना सुरुवात झाली होती.
‘यशदा रिअल्टी ग्रुप’, ‘शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन’ आणि किशान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत अडीच हजारांपेक्षा अधिक धावकांनी सहभाग घेतला होता. अतिशय उत्कंठापूर्वक वातावरणात २१ कि.मी. अंतराची हाफ मॅरेथॉन सकाळी वेळेवर ५.३० वाजताच सुरु झाली. त्यानंतर अनुक्रमे १० आणि ५ किमी अंतराच्या शर्यती पार पडल्या. या शर्यतीत साड्या परिधान करून महिलांनीही सहभाग नोंदवला. तसेच अंध विद्यार्थीही या ‘हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत धावले.
त्याआधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, यशदाचे अध्यक्ष वसंत काटे आदी मान्यवरांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आयोजकांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, उद्योजक संजय भिसे, विजय काटे, सुर्यकांत जाधव, रोहिदास गवारी आदी उपस्थित होते.
२१ किमी, १० आणि ५ किमी अंतराच्या शर्यतींना पिंपळे सौदागर येथील रोझआयकॉन सोसायटीच्या आवारातील मोकळ्या मैदानातून प्रारंभ झाला. स्पर्धेचा प्रारंभ कुंजीर चौक-शिवार चौक-रक्षक चौक येथून तर परतीचा प्रवास पीके चौक-कोकणे चौक-कासारवाडी नाशिक फाटा ते प्रारंभस्थानी असा होता. स्पर्धेअंती सर्व गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात आली.
”दरवर्षी ‘यशदा पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन’ (PCHM) स्पर्धा वेगवेगळ्या गटांमध्ये आयोजित होते. या स्पर्धेत २१, १० आणि ५ किमी अंतराच्या शर्यतींचा समावेश असतो. यंदा मॅरेथॉनमध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त स्पर्धक यात सहभागी झाले होते. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, फिनिशर्स मेडल, टायमिंग ई-सर्टिफिकेट, मेडिकल सपोर्ट आदी बाबीं पुरविण्यात येतात. फक्त पिंपरी चिंचवडच नव्हे तर, पुण्यासह राज्यभरातून धावपटू या मॅरेथॉनमध्य सहभागी होतात. मॅरेथाॅनचं यंदाचं चौथे वर्ष होत. नवनवीन लोकांना धावण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातात. मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढते आहे. स्वच्छ, सुंदर पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो.” – मा. वसंत काटे, आयोजक – ‘यशदा पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन’ (PCHM)…











