न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. आयुक्तालयाची घड़ी बसवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण अपेक्षित होते. त्यानुसार विनय कुमार चौबे यांनी तो पूर्ण केला आहे. दोन वर्षात चौबे यांनी जागा, मनुष्यबळ, वाहने उपलब्ध करून घेत आयुक्तालयाची घडी बसवली आहे.
शहर, औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस दलाची विभागणी करून स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. सुरुवातीच्या काही वर्षांत पुरेसे मनुष्यबळ, वाहने, जागा, इमारत वासह नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती, पथके आदीची उपलब्धता करून देणे आवश्यक होते.
तत्कालीन पोलिस आयुक्तांनी प्रयत्न केले. मात्र, कोणालाच दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांची मुदतपूर्व बदली झाली. अडचणी समजून घेऊन पाठपुरावा करीत असतानाच चारही आयुक्तांच्या बदल्या झाल्या. मात्र, अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी असलेले चौबे दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलिस आयुक्त ठरले आहेत.











