न्यूज पीसीएसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय खुले प्रदर्शन केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. मे २०२० पर्यंत ते काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ४४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रावर प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील विकासकामे मार्गी लावण्यात येणार आहेत. दरम्यान, कामाची गती पाहता अवघ्या वर्षभरात हे काम पूर्ण होईल, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशीतील २४० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय दहा वर्षापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, आर्थिक तरतूदअभावी हा प्रकल्प रखडला.
त्यानंतर २०१७ मध्ये प्राधिकरणाने हा प्रकल्प टप्प्याटप्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्याचे प्राथमिक काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे काम हाती घेण्यात आले आहे. ते जवळपास २०.११ हेक्टर म्हणजेच ४९ एकरमध्ये विकसित केले जाणार आहे. २१ फेब्रुवारीला या कामाचा आदेश देण्यात आला होता.















