न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन (मतदान यंत्रे) बालेवाडी क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. निवडणूक विभागाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून मतमोजणी प्रक्रियेची माहिती देण्यासाठी निवडणूक विभागाने निवडणूक लढविलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची आज (सोमवारी) बैठक आयोजित केली होती.
आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावर ही बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे प्रतिनिधी मयुर कलाटे, फजल शेख, प्रदीप गायकवाड, शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांचे प्रतिनिधी देखील बैठकीला उपस्थित होते.
कविता द्विवेदी म्हणाल्या, मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीसाठी २४ टेबल असणार आहेत. एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाठी उमेदवारांचे स्वतंत्र प्रतिनिधी असणार आहेत. प्रत्येकाकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रतिनिधी बदलता येणार नाही. या मतदारसंघातून दुस-या मतदारसंघात जाता येणार नाही. पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्याच ठिकाणी वाहने पार्क करावीत.
उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी दिवशी सकाळी सहा वाजता हजर रहावे. ‘स्ट्राँग रुम’ उघडताना प्रतिनिधीने उपस्थित रहावे. आतमध्ये कोणालाही मोबाईल आणता कामा नये. सकाळी सात वाजता आल्यास मतमोजणीला उशिर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. व्हीव्हीपॅटची मतमोजणी करण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे मतमोजणीचा कालावधी वाढू शकतो. प्रतिनिधींनी जेवण, चहा, नाष्ट्यांची सोय करावी. एकदा मतमोजणी कक्षात प्रवेश केल्यास बाहेर पडता येणार नाही. बाहेर पडल्यास पुन्हा आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही द्विवेदी यांनी दिल्या आहेत.











