- नव्या वर्षात पेपरलेस कारभाराचा संकल्प..
 - नागरिकांची कामे जलदगतीने होण्यासाठी प्रयत्नशील – अति. आयुक्त सिंगला…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. ०४ जानेवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रशासकीय कारभार आता पेपरलेस होणार आहे. नागरिकांशी संबंधीत सर्व विभागातील कामकाज ऑनलाइन केले जाणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही कामासाठी नागरिकांना पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. ऑनलाइन सुविधा अमलात आल्यास नागरिकांचा बहुमूल्य वेळ आणि आर्थिक खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
राज्याभरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएचा समावेश असून विविध कामांसाठी नागरिकांना आकुर्डी येथील कार्यालयात यावे लागते. पीएमआरडीएच्या हद्दीत ९ तालुके आणि ८१६ गावे येतात, बांधकाम परवाने, अग्रिशामक परवाने, तक्रारी, मागणी आदी पत्रव्यवहार करण्यासाठी नागरिकांना ग्रामीण भागातून येथे यावे लागते. दिवसभराचा वेळ घालवून देखील काम होत नसल्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते, विशेष म्हणजे अभियांत्रिकी, प्रशासन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाशी संबंधित फाईलवर अधिका-यांच्या स्वाक्षरी वेळेत होत नसल्यामुळे ढीगभर फाईली पेडींग राहतात. या परिस्थितीला छेद देण्यासाठी नागरिकांचे हेलपाटे कमी व्हावेत, त्याचप्रमाणे संबंधित अर्जदार यांना त्याची माहिती उपलब्ध व्हावी. यासाठी ऑनलाइन कामकाज उपलब्ध केले जाणार आहे.
बांधकाम परवानगी पासून प्रशासकीय माहिती उपलब्ध करुन देण्यापर्यंत सर्व कामे ऑनलाइन माध्यमातून नागरिकांना हाताळता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला त्याची सध्यस्थितीत ऑनलाइन पाहता येणार आहे. कोणत्या कारणासाठी फाइल थांबली अथवा अर्ज रखडला याचे देखील स्टेटस पाहता येणार आहे. त्यानुसार संबंधित व्यक्ती अथवा संस्थेला ऑनलाईन पाठपुरावा करता येणार आहे. परिणामी, नागरिकांना घरबसल्या किंवा संस्थांना त्यांच्या कार्यालयातूनच ऑनलाइन कामकाज हाताळता येणार आहे.
विकास परवानगी विभागामध्ये पीएमआरडीएमधील वेगवेगळ्या गावातून बांधकाम परवानगीसाठी फाईली येत असतात. त्यातच दिवसाला जवळपास दहा ते पंधरा फाईली या इनवर्ड होतात. तर, अधिका-यांची फाईलवर स्वाक्षरी घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांचे प्रतिनिधी दिवसभर कार्यालयात ताटकळत थांबतात. कामकाज शीघ्र गतीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे या विभागाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार या कामाला आता गती मिळाली असून कागदपत्रांची छाननी केल्यानंतर तातडीने त्या फाइलवर स्वाक्षरी केली जात आहे.
नागरिकांना कामासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांना ऑनलाइन कामकाज करता यावे, यासाठी संपूर्ण कामकाज पेपरलेस करण्यावर भर आहे. त्याची सुरुवात अनधिकृत बांधकाम आणि अग्निशामक विभागातून केली जाईल. टप्प्याटप्प्याने इतर विभागाचे कामकाज ऑनलाइन केले जाईल. एकूणच पीएमआरडीएचे कामकाज पेपरलेस केल्यानंतर नागरिकांना कोणत्याही कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही.
दीपक सिंगला, अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए…
                                                                    
                        		                    
							












