- यापुढे कारवाईचा फास आवळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने अनधिकृत बांधकामे, होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पीएमआरडीए प्रशासनाने गेल्या वर्षभरात सुमारे ३५० बांधकामांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये अनधिकृत असलेली सुमारे ९५ बांधकामे, होर्डिंग हटविण्याची कार्यवाही प्रशासनाने केली आहे. त्यामध्ये २४ होर्डिंगचा समावेश आहे. यापुढेही ही कारवाई सुरुच ठेवली जाणार आहे. त्याचप्रमाणे, बांधकामांचे सर्वेक्षणदेखील केले जाणार आहे, असे पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नोटीस दिल्यानंतरही बांधकाम सुरू ठेवून नियमभंग करणाऱ्या ५ जणांवर फौजदारी कारवाई केली आहे. येथून पुढे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. पीएमआरडीए, हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंगसह अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच, अशी अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
पीएमआरडीए प्रशासनाने यापूर्वी लोणीकंद, केसनंद येथील अनधिकृत होर्डिंगसह बांधकाम काढून टाकले होते. त्याचप्रमाणे, अनधिकृत होर्डिंग, सोसायटीतील सदनिकाधारकांनी अनधिकृतपणे केलेले पत्राशेड क्रेन, गॅस कटर आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने काढण्यात आले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, राजेंद्र रांजणे, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली कारवाई केली जात आहे.












