न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ०७ जानेवारी २०२५) :- देहूगावात इंद्रायणी नदीकाठी असलेल्या नगरपंचायतीच्या रोहित्राची चोरी करण्यासाठी आलेल्या पाच अज्ञात चोरट्यांनी नगरपंचायतीच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. तसेच, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा पळवला. ही घटना शनिवारी (दि. ४) रात्री एकच्या सुमारास घडली. पवन मोरे आणि कुमार काळोखे (रा. देहूगाव) असे किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरपंचायत हद्दीतील इंद्रायणी नदीकाठी देह नगरपंचायतीचे मलशुद्धीकरण केंद्र आहे. येथील रोहित्राची एकाच वर्षात सुमारे चारवेळा चोरी झाली आहे. शनिवारी पहाटे रोहित्र चोरीसाठी पाच अज्ञात चोरटे आले होते. मात्र, त्या ठिकाणी नगरपंचायतीचे दोन कर्मचारी बंदोबस्तावर असल्याने चोरट्यांनी तेथील काचा फोडून कॅबिनचे नुकसान केले आणि त्यांच्यावर हल्ला चढविला. दोघांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी अज्ञात चोरट्यांनी दिली.
या वेळी पळून जाताना चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले. या घटनेची माहिती देहूरोड पोलिस ठाण्याला मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.
                                                                    
                        		                    
							












