- अशा पदपथांवर घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२५) :- महापालिकेच्या ‘अर्बन स्ट्रीट’ योजनेअंतर्गत शहरातील पदपथ रुंदावल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. या परिस्थितीत काही बेशिस्त वाहनचालक पदपथाचा वापर करून पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करतात. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी अशा १ लाख २५ हजार ५२८ वाहनचालकांवर कारवाई करत जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यांत १० कोटी ८० लाख २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पदपथाचा गैरवापर करणाऱ्या ३७६५ वाहनचालकांवर कठोर कारवाई करत त्यांच्याकडून २२ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पहिल्या वेळी ५०० रुपये आणि पुन्हा नियम मोडल्यास १५०० रुपयांचा दंड आकारला जातो.
शहरातील काही चौकांमध्ये सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागतात. यावेळी काही चालक नियम तोडून पदपथावरून वाहने चालवतात. यामुळे पादचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आणि अपघाताची शक्यता वाढते.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते; मात्र पोलिसांच्या कारवाईला विरोध करणाऱ्या काही जणांवर गुन्हेही दाखल केले जातात. त्यामुळे वाहन चालवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पदपथ पादचाऱ्यांच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी आहेत; मात्र, वाहनचालकांकडून होणारी घुसखोरी नियमबाह्य आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत १ लाख २५ हजार ५२८ जणांवर कारवाई करून १० कोटी ८० लाख २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नियमांचे पालन करून पादचाऱ्यांना चालण्यासाठी त्यांची हकाचा जागा मिळावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी केले.












