न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२४) :- महिलेने चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी तिच्या घरात घुसून पर्स पळविली. तसेच, वॉशिंग मशीन आणि दुचाकीची तोडफोड केली. ही घटना मंगळवार (दि. ७) रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.
सूरज चंद्रकांत कुन्हाडे (२२, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. ८) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला घरी झोपल्या होत्या. त्या वेळी आरोपी सूरज हा आपल्या तीन साथीदारांसह तिथे आला. फिर्यादी महिलेच्या बहिणीने आरोपी सूरज याला चपलेने मारल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या दरवाजा व खिडकीवर दगडफेक करीत खिडकीची काच फोडली. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या घरात घसून तिची पर्स चोरून नेली. तसेच, जाताना घराबाहेर ठेवलेली वॉशिंग मशीन आणि दुचाकीची तोडफोड केली. कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे. जर कोणी मध्ये आले तर सोडणार नाही, असे म्हणत दहशत निर्माण केली. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.












