- मृत्यूचा सापळा बनलेला हा महामार्ग उन्नत कधी होणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. 16 जानेवारी 2025) :- शिक्रापूर-चाकण-तळेगाव महामार्गावर सुसाट कंटनेरने 10 ते 15 जणांना उडवले आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर, एकाचा पायच कापला गेला आहे.
तब्बल 10-15 गाड्या एकमेकांवर धडकल्या आहे. या विचित्र अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. हा अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही.
चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनरकडून हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.
शिक्रापूर-चाकण-तळेगाव हा महामार्ग खरोखरच मृत्यूचा सापळा बनलेला आहे. अरुंद रस्ता त्यात भलीमोठी वाहतूक कोंडी यामुळे नेहमीच छोटे-मोठे अपघात या महामार्गावर सतत घडत असतात. मोठ्या स्वरूपात कामगार वर्ग या परिसरात कामाला जात असल्याने दररोजच या रस्त्यावर वाहतूक कोंडीची मोठी जत्रा भरत असते. याला वैतागुन नागरिकांनी बंदची हाक देताच प्रशासन केवळ रस्त्यासाठी पुढाकार घेत असल्याचे नोटंकी करते. त्यात नेते मंडळी देखील काही कमी नाहीत. केंद्र सरकारने या महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याची योजना आणली, असे मध्यंतरी सांगितले. परंतु, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपताच जाणून बुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष केले. त्यात कढी म्हणजे शिक्रापूर-चाकण-तळेगाव या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याऐवजी कासारवाडी ते खेड असा उन्नत महामार्ग उभारण्याची मध्यंतरी घोषणा केली. त्यामुळे येथील नागरिकांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळण्याचा प्रकार सरकारकडून होत आहे. त्यामुळे असे अपघात नेहमीच होणार, यात शंका नाही.