- व्हॅनच्या चालकासह नऊ जणांचा जागीच मृत्यू; सात गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. 17 जानेवारी 2025) :- नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर मुक्ताई ढाब्याजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो व्हॅन व इतर दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात मॅक्झिमो व्हॅनच्या चालकासह नऊ जणांचा मृत्यू झाला असून सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
या पैकी सहा जणांवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात तर एका गंभीर जखमीला पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार महिला, चार पुरुष व एक लहान मुलगा आहे. अपघात शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजता झाला. आशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
चालक विनोद रोकडे हे मॅक्झिमो व्हॅन आळेफाटा येथून सोळा प्रवासी घेऊन नारायणगावकडे येत होते. पावणेदहा वाजण्याच्या सुमारास येथील मुक्ताबाई ढाब्या समोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने प्रवासी व्हॅनला मागून धडक दिली. त्यानंतर प्रवासी व्हॅन महामार्गाच्या कडेला बंद असलेल्या एसटी बसला धडकली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या व्यक्तींनी दिली. प्रवासी वाहनाला मागून व पुढून अशा दोन्ही बाजूंनी धडक बसल्याने प्रवासी वाहनाचा चक्काचूर झाल्याने अपघाताची तीव्रता वाढली.
घटनास्थळी सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी सहा जणांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात तर एक जणाला पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. युवराज वाव्हळ हा महाविद्यालयीन तरुण नारायणगाव येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो येथील अकादमीत अभ्यास करण्यासाठी निघाला होता त्याच्यावर देखील काळाने घाला घातला आहे.












