न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२५) :- वाकड, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, माण, म्हाळुंगे या भागात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करून काही नवीन रस्त्यांचे नियोजन करण्याचा तसेच आवश्यक ठिकाणी पूल बांधून वाहतुकीचेही नव्याने नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहिल्या शंभर दिवसांत राबवावयाच्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून आ. शंकर जगताप यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयात महत्त्वाची बैठक घेतली.
पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या या बैठकीस आ. जगताप, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, मुख्य अभियंता (अभियांत्रिकी-१) अशोक भालकर सहआयुक्त हिम्मत खराडे, उपसंचालक व महा नियोजनकार श्वेता पाटील, मुख्य अभियंता (अभियांत्रिकी- २) रिनाज पठाण तसेच माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए हद्दीतील वाकड, पुनावळे, ताथवडे, हिंजवडी, मान, आणि म्हाळुंगे या भागांमध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करून नवीन रस्त्यांचे नियोजन करण्याचे ठरले. नाल्यावर पूल उभारणे, तसेच वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करणे. आवश्यकतेनुसार रस्त्यांची लांबी-रुंदी वाढवणे आणि नदीकाठच्या भागात रिव्हर फ्रंट विकसित करणे यावर भर देण्यात आला. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या परताव्यासाठी जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे ठरले. 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार, 106 शेतकऱ्यांना 6.25% जमीन परतावा देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले. वाकड येथील शासकीय भूखंड महानगरपालिकेला हस्तांतरित करून त्या ठिकाणी क्रीडांगण विकसित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. हिंजवडी मान परिसरातील मेट्रो स्थानकांचे नाव “शिवाजी चौक” ऐवजी “छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे करण्याचा ठराव मांडण्यात आला.












