न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक न देणाऱ्या शाळांवर व अकार्यक्षम पिंपरी चिंचवड महापालिकेतील संबंधित शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा कायदा असतानादेखील अनेक शाळा पाठ्यपुस्तके मोफत न देता पालकांकडून शालेय साहित्यासाठी हजारो रुपये घेतात. अनेक पालकांनी तक्रार करूनही शिक्षण अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. यावरून शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकारी यांच्यातील संगनमत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
याची गंभीर दखल घेऊन शिक्षण अधिकारी यांची बदली करण्यात यावी, असे न झाल्यास येणा-या काळात जनआंदोलन करण्यात येईलू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अध्यक्ष संतोष जोगदंड, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र साळवे, विनोद सरवदे, विष्णू सरपते, विनोद क्षीरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


















