- जिल्हा नियोजन समितीत दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधी देणार..
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमात आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२५) :- ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटत आहे. दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्याचे काम सरकार करेल. त्यांना सक्षम बनविण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी विविध पावले उचलण्यात येतील. दिव्यांगांच्या कल्याणासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीतील ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करावा, याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल,’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ याकाळात ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय सचिव राजेश अगरवाल, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अजित पवार म्हणाले, ‘राज्यामध्ये जवळपास एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के दिव्यांगांची संख्या आहे. दिव्यांग व्यक्तींची एकूण संख्या किती आहे, याची आकडेवारी संकलित करून योजनांचा आढावा घेऊन आखणी करण्यात येईल. मार्च महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. याशिवाय जिल्हा नियोजन समितीतून विविध योजनांसाठी निधी दिला जातो. आगामी काळात राज्यातील ३६ जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमधील निधीचा काही भाग हा केवळ दिव्यांगांसाठी खर्च केला जावा, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. याशिवाय राज्याने सुरू केलेल्या दिव्यांग कल्याण विभागासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याबाबत देखील प्रयत्न केले जातील. सध्या पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दिव्यागांना प्रमाणपत्र दिले जात आहे. ससून रुग्णालयात देखील प्रमाणपत्र दिले जाते. उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी आवश्यक ते निर्देश देणार आहे,’ असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.











