- आळंदी आणि चऱ्होली येथील दोन गुन्ह्यांची उकल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२५) :-शोरूमने विक्री केलेली अॅक्टिव्हा गाडी ग्राहकांना न देता परस्परपणे त्याची दुसऱ्याला चढ्या दराने विक्री करून दोन गिऱ्हाईकांची फसवणूक करणाऱ्या डिलरला पोलीसांनी अटक केली आहे.
हा प्रकार आळंदी आणि चर्होली येथे घडला आहे. याप्रकरणी पोलीसांनी आनंद शिंदे या समर्थ ऑटोमोबाईल शोरूमच्या डीलरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिर्हाईकाच्या घरी जाऊन शोरूम मधून खरेदी केलेली गाडी पासिंग चे कारण सांगून आरोपी शिंदे याने नेली होती. परत मागितली असता ‘तुला काय करायचे ते कर, तुला गाडी परत मिळणार नाही’ अशी धमकी देत गाडी देण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मरकळ रोड, आळंदी येथे घडला. याप्रकरणी नरेश निळे यांनी आनंद शिंदे याच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आळंदी पोलीस ठाण्यात आनंद वर गुन्हा दाखल होता.
दुसऱ्या घटनेत परिणीती होंडा शोरूम च्या कर्मचाऱ्यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन दुचाकी गाडी अॅक्टिवा विकत देण्याच्या आमिषाने फिर्यादीच्या पत्नीच्या गाडी बुकिंग फायनान्स आणि इतर कागदपत्रांवर सह्या घेतल्या. गाडी फिर्यादीच्या ताब्यात न देता परस्पर आरोपी शिंदे याच्या ताब्यात दिली. ती गाडी आरोपी शिंदेने तिसऱ्याला देत फिर्यादीची फसवणूक केली आहे. हा प्रकार 03 ऑक्टोबर रोजी चऱ्होली येथील समर्थ ऑटोमोबाईल येथे घडलेला आहे. रवींद्र नाथजोगी यांनी आनंद शिंदे यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.














